औरंगाबाद : मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतपीठ व्हावे, ही मागील ४० वर्षांपासूनची मागणी आपल्या कार्यकाळात पूर्णत्त्वास येत आहे, ही आनंदाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले आहे. १ सप्टेंबरपासून संतपीठाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी ग्वाही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
शुक्रवारी १६ जुलै रोजी डॉ. प्रमोद येवले यांच्या कुलगुरु पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने संतपीठाने आता गती घेतली आहे. आता तेथे सुरुवातीला सर्टीफेकट कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. संतपीठासाठी विद्यापीठाने ५० लाखांची तरतूद केलेली असून, शासनानेही ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन निधीतून १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून संतपीठाच्या इमारतीची डागडुजी, इलेक्ट्रीफिकेशन केले जात आहे. शनिवारी १७ जुलै रोजी पैठण येथे संतपीठातच एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला माझ्यासोबत विद्यापीठातील काही अधिकारी तसेच संतसाहित्यामध्ये ज्यांचे चांगले योगदान आहे. अशा ५० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याकडून यासंदर्भात काही कल्पना जाणून घेऊन सुरुवातीला काही सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करणार आहोत.
विद्यापीठात शिस्त आणलीविद्यापीठात मागे काही काळ चाललेला गोंधळ आता फारसा ऐकायला येत नाही, यावर कुलगुरु डॉ. येवले म्हणाले, माझ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले. पूर्वीही विद्यापीठात तेच अधिकारी- कर्मचारी कार्यरत होते. आताही तेच आहेत. आपण शिस्तीने राहिलो, की सारेच शिस्त बाळगतात. माझा दोन वर्षांचा कार्यकाळ समाधानाचा गेला.
‘एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ अभ्यासक्रम लवकरचभारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या नावाला साजेसे विविध अभ्यासक्रम, सामाजिक उपक्रम, संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. ‘भारतीय संविधान’ हा विषय पदवी व पदव्युत्तर वर्गांना शिकविणारे आपले हे पहिले विद्यापीठ आहे. ‘एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ ही बाबासाहेबांची संकल्पना होती. समाजाला चांगले नेतृत्व मिळाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी एक संस्था सुरू केली होती. ती पुढे फार काळ चालली नाही. तीच संकल्पना घेऊन आम्ही लवकरच एक पीजी डिप्लोमा सुरू करत आहोत.