वाळूज महानगर : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण शनिवारी वाळूज महानगरसह परिसरात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच नागरिकांची गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या लाकडी काठीपासून आंब्याची पाने, कडुलिंबाची फांदी, साखरेचा व खोबऱ्याचा हार, फुलांचा हार, नवीन साडी, त्यावर ठेवण्यासाठी पितळाचा तांब्या आदी साहित्य जमविण्यासाठी लगबग सुरूहोती. घरोघरी सकाळी लाकडी काठीला नवरीसारखे नटवून घरासमोर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. नागरिकांनी गुढीचे मनोभावे पूजन केले. यावेळी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर मित्र परिवार व नातेवाईकांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पुरणपोळीचा आस्वाद घेतला. तसेच अनेकांनी सोने, वाहने खरेदी केली. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही. या परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव, गोलवाडी, जोगेश्वरी, पंढरपूर, वळदगाव, वाळूज, कमळापूर, पाटोदा, गंगापूर नेहरी, शिवराई, लांझी, नायगाव, बकवालनगर आदी भागात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वामी समर्थ केंद्रात कार्यक्रमबजाजनगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. हर्षल भेंडाळे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांग पूजन व वाचन करून उपस्थित भाविकांना पाडव्याचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाला वैजिनाथ निंबाळकर, नवनाथ मनाळ, आशा साळवे, कोमल चित्रक, योगिता दरेकर, अरुण ठाकरे, गोपाळ पाटील आदींसह सेवेकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.