बीड : चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे मराठी नववर्ष. यानिमित्ताने जिल्ह्यात घरोघर गुढ्या उभारुन पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच अनेक ठिकाणी घरांवर भगव्या पताका फडकावण्यात आल्या.गुढीपाडव्यानिमित्त सकाळ पासूनच सर्वत्र चैतन्याचे वातावरण पहावयास मिळाले. परंपरेनुसार काही ठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या तर काही गावांत व शहरातील काही घरांवर भगव्या पताकाही डौलाने फडकताना दिसल्या. घरोघर अंगणात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पुरणपोळ्या व गोडधोड पदार्थांची रेलचेल दिसून येत होती. गुढ्यांना नैवेद्य देऊन सर्वांनी सुख, समृद्धी व भरभराटीचा संकल्प केला. याशिवाय एकमेकांना साखरगाठी देऊन सणाचा गोडवा वाढविण्यात आला. बीडसह अंबाजोगाई, गेवराई, शिरुर, आष्टी, पाटोदा, वडवणी, धारुर, केज, परळी, माजलगाव या तालुक्यांत भगव्या पताका फडकावण्यात आल्या. काही ठिकाणी मात्र, पारंपरिक पद्धतीने गुढ्या उभारुन सण साजरा झाला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात गुढीपाडवा उत्साहात
By admin | Published: March 28, 2017 11:29 PM