वाळूज महानगर : बजाजनगरातील कामगार कल्याण केंद्रात सोमवारी (दि.२२) आरोग्य विभागातर्फे वाळूज महानगरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात डॉक्टरांना मार्गदर्शन करून विविध सूचना करण्यात आल्या.
बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करून विविध सूचना केल्या. खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास या रुग्णांना कोरोना चाचणीसाठी आरोग्य केंद्रात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचबरोबर संबंधित रुग्णाचा पत्ता व फोननंबर घेऊन संबंधित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे अशा घरावर स्टिकर लावणे, पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास परिसर सील करणार असल्याचे सांगण्यात आले. या भागातील दोन्ही कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या बैठकीत खासगी रुग्णालयात कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खासगी डॉक्टरांनी केली. बैठकीला वाळूजमहानगर डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. प्रशांत टेमकर, डॉ. सचिन चिटणीस, डॉ. विश्वजित अकोलकर, डॉ. साईनाथ येनगंदुल, डॉ. विशाल लहाने, डॉ. संदीप राठोड, डॉ. प्रज्योत पाटील, डॉ. पंकज बलदोटा, डॉ. विलास भाकरे, डॉ. अमोल हावळ, डॉ. दिनकर कराड, भगवान पवार आदीसह जवळपास ५० खासगी डॉक्टरांची उपस्थिती होती.
फोटो ओळ
बजाजनगरातील कामगार कल्याण केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना कोविडच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या.