लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीसंदर्भात सोमवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौर नंदकुमार घोडेले यांना ठराव देणार आहेत. या ठरावावर नेमका कोणता निर्णय घ्यावा यासाठी शिवसेनेचे महापौर पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन घेणार आहेत. श्रेष्ठींच्या स्तरावर मार्गदर्शन न मिळाल्यास ‘मातोश्री’पर्यंत जावे लागणार आहे. बुधवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची प्रत मनपा आयुक्तांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाची आहे.समांतर जलवाहिनीचे काम केलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनी आणि महापालिका यांच्यात न्यायालयाच्या बाहेर तडजोड व्हावी, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. एकीकडे तडजोडीची भाषा करणाऱ्या कंपनीने चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात वेगळाच प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात कंपनीने पुन्हा काम करण्यासाठी योजनेच्या फरकाची रक्कम ३९२ कोटी रुपये द्यावी, दरवर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. महापालिका आणि राज्य शासनालाही या मागण्या मान्य नाहीत. कंपनीच्या प्रस्तावाचा अभ्यास करून सोमवारी मनपा आयुक्त स्वतंत्र ठराव महापौरांना देणार आहेत. या ठरावात आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
‘समांतर’च्या ठरावासाठी ‘श्रेष्ठीं’चे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:20 AM