औरंगाबाद : गुजरात दौऱ्यावरून परतल्यानंतर खा. इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत सोमवारी रात्री त्यांनी स्वतः सोशल मीडियातून चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यांच्यावर सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल चार महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्या तिहेरी आकड्यात आल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची कोरोना चाचणी सोमवारी पॉझिटिव्ह आली आहे. ते नुकतेच गुजरात येथील अहमदाबाद महापालिकेच्या निवडणूक दौऱ्यावरून शहरात परतले होते. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले होते. सोमवारी रात्री त्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
निवडणूकीत यश, कोरोनाने हरवलेदरम्यान, गुजरातमधील अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीची धुरा खा. जलील यांच्यावर होती. यात एमआयएमने चांगले यश संपादन केले आहे. बेहरमपुरा वार्डातील सर्व ४ जागांवर एमआयएमने विजय मिळवला आहे. तर इतर वार्डात मतमोजणीसुरु आहे. यामुळे खा. इम्तियाज जलील यांनी गुजरात निवडणुकांमध्ये यश मिळवून दिले मात्र कोरोनाने त्यांना हरवले असल्याची चर्चा आहे.