औरंगाबाद : गुजरातमधील आलमदार सिड्स (नागलपुर, ता. अंजर, जि. कच्छ) कंपनीला महाराष्ट्रात कृषी बियाणे विक्रीला परवानगी नसतानाही शहरातील एका कृषी दुकानदाराला ८ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे तब्बल १ हजार किलो घासाचे बियाणे पाठवले. त्याठिकाणी कृषी विभागाने मारलेल्या छाप्यात हा सर्व भांडाफोड झाला. याविषयी समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे कृषी विभागाने आलमदार सिड्स कंपनीच्या मालकासह संचालकांवर क्रांती चौक ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.
कृषि विभागाचे विभागीय गुणनियंत्रण आशिष काळुशे यांनी २१ सप्टेंबर रोजी नविन मोंढा येथील उमेश कृषि केंद्रांतील बियाणांची तपासणी केली. तेव्हा त्यांना आलमदार सिड्स कंपनीचे आलमदार -५१ या वाणाचे बियाणे विक्रीसाठी साठवुन ठेवल्याचे आढळले. तेव्हा केंद्राचे मालक उमेश सोनी यांच्याकडे बियाणाविषयी चौकशी केल्यानंतर त्यांनी ३ सप्टेंबर रोजी कंपनीने १ किलो पॅकिंग असलेल्या बियाण्याच्या १ हजार बॅग पाठविल्याची माहिती दिली. तेव्हा काळुशे यांनी केंद्र मालकास कंपनीकडून बिल व विक्रीचा परवाना प्रत मागविण्यास सांगितले. मात्र, ती उपलब्ध होऊ शकली नाही. तेव्हा बियाणे विक्री करु नये, असे लेखी आदेश दिले. तसेच कंपनी विनापरवाना बियाणे विक्री करीत असल्याची शंका आली. त्यानंतर कंपनी व विक्रेता यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्या. त्यावर विक्री केंद्राने १० ऑक्टोंबर रोजी खुलासा करीत कंपनीकडे बियाणे विक्रीचा परवाना असल्याचे गृहीत धरुन बियाणे पुरवठा आदेश दिला. तथापी बियाणे पुरवठावेळी कंपनीने प्रिंसीपल व लायसन्सची कॉपी न पाठविल्याने सदरील बियाणे विक्री केले नसल्याचे केंद्राचे मालक सोनी यांनी स्पष्ट केले.
यानंतर कृषी विभागाने आलमदार सिड्स कंपनीसोबत पत्रव्यवहार करीत परवाना असलेली प्रत मागविली. मात्र संबंधित कंपनीकडे बियाणे विक्रीचा परवानाच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीचे मालक, संचालक आणि जबाबदार व्यक्ती प्रफुल भवनभाई चव्हाण (रा.नागलपुरा मोती, ता. अंजर, जि. कच्छ) यांच्या विरोधात क्रांतीचौक ठाण्यात काळुशे यांनी तक्रार नोंदवली. त्यावरुन फसवणूकीसह बियाणे नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. अधिक तपास निरीक्षक राजेंद्र होळकर करीत आहेत.