मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून, या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बसत आहे. मात्र, या चक्रावादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला असून मराठावाड्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडला आहे. बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत.
गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यात, सोमवारी मराठवाड्यासाठी अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आला असून नदीकाठावरील वाकडी गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे, येथील तीन घरांतील गावकऱ्यांना घराच्या छतावर जाऊन स्वत:चा बचाव करावा लागला आहे. मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात पाणीच पाणी
जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.२७) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले.
कोकण आणि मुंबईला इशारा
दरम्यान, आज 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथेही वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असणार आहे. कोकणाच्या किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे हवामान खात्याच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी म्हटलंय.