औरंगाबाद : शहराचे मध्यवर्ती स्थान असलेल्या आणि अत्यंत गजबजलेल्या गुलमंडी, कुंभारवाडा रस्त्यावर बुधवारी सकाळी १० वाजता मोकाट कुत्र्याने तब्बल पाचजणांचे लचके तोडले. या भागात खरेदीसाठी आलेले सर्वसामान्य नागरिक, व्यापाऱ्यांचा थरकाप उडाला. पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी त्वरित महापालिकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्या कुत्र्याला पकडण्यात यश आले नाही.
शहरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलांना मोकाट कुत्रे चावल्याच्या घटना दररोज घडत आहेत. त्यानंतरही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच मनपाचे पथकही तैनात केलेले आहे. मागील वर्षभरात महापालिकेने सहा हजार मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली. यानंतरही शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बेवारस कुत्र्यांच्या पिलांना दत्तक घेण्याची योजना मनपाकडून राबविण्यात येत असली, तरी या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नाही.
शहराच्या अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती गुलमंडी-कुंभारवाडा रस्त्यावर बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडण्याच्या तयारीत असताना एका मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला. दैनंदिन व्यवहार सकाळी नेहमीप्रमाणे सुरू असताना अचानक गुलमंडीवरून हे कुत्रे धावत सुटले. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना चावा घेत पिसाळलेला कुत्रा कुंभारवाडयात शिरला. याठिकाणी कुत्र्याने तीन ते चारजणांना चावा घेतला. कुत्रा चावत असल्याचे कळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. कुत्र्याने चावा घेतलेल्या तीन तरुणांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, तर दोघांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली.
मनपाचे पथक रिकाम्या हाताने परतलेही माहिती मनपाच्या पथकाला देण्यात आली. पथकप्रमुख शेख शाहेद यांनी तातडीने दोन डॉग व्हॅनसह पथकाला कुत्र्याला पकडण्यासाठी पाठविले. पथकाने मोकाट कुत्र्याचा पाठलाग केला; परंतु या कुत्र्याने गल्लीतून धूम ठोकली. त्यामुळे मनपाचे पथक कुत्र्याला न पकडताच रिकाम्या हाताने परतले.