छत्रपती संभाजीनगर : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. एकाही रस्त्यावर ग्राहकांना पायी फिरणेही अशक्यप्राय ठरत आहे. बुधवारी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी गुलमंडीने मोकळा श्वास घ्यावा, यासाठी माेहीम सुरू केली. सुपारी हनुमान मंदिरासमोरील रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या फूल, भाजीपाला विक्रेत्यांना बुधवारी हटविण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी दोन माजी सैनिकही नेमले.
जुन्या शहरातील अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला. नागरिकांना मुख्य रस्त्यांवरून ये-जा करताना किती त्रास सहन करावा लागतोय हे मांडण्यात आले. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले. बुधवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सुपारी हनुमान मंदिरासमोरील फूल, भाजीपाला विक्रेत्यांना हटविले. साहित्य विक्रीनंतर व्यापारी रस्त्यावरच कचरा सोडून निघून जात असत. रस्त्याच्या मध्यभागी ते व्यवसाय करीत असल्याने दुचाकी वाहनही मंदिरासमोरून ये-जा करू शकत नव्हते. वर्षानुवर्षे हे अतिक्रमण होते. मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्याचे साहस कोणीही केले नव्हते. सर्व अतिक्रमणे हटविल्याने चारचाकी वाहनेही जाऊ लागली. या भागातील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या कारवाईचे कौतुक केले. अनेक ज्येष्ठ नागरिक चारचाकी वाहनात बसून थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत.
सर्व व्यापाऱ्यांना प्रशासनाचा इशारागुलमंडीवर बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर विविध साहित्य लटकवलेले आहेत. दुकानाच्या शटरपासून किमान पाच ते सात फूट अंतरापर्यंत ही अतिक्रमणे आहेत. अनेक ठिकाणी दुकानासमोर कोणी वाहने उभी करू नयेत म्हणून चक्क लोखंडी जाळ्या ठेवल्या आहेत. अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण चालणार नाही. व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत. लवकरच पोलिस, वाहतूक पोलिस यांच्यासह मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली.
महत्त्वाचे सण जवळनवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. सणांमध्ये खरेदीसाठी गुलमंडीवरील प्रत्येक रस्त्यावर ग्राहकांची अलोट गर्दी असते. ग्राहकांना मुक्तपणे खरेदी करता आली पाहिजे. रस्त्यावर कोणताही अडथळा असता कामा नये. ग्राहकांना त्रास होणार नाही, याची काळजी मनपा घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.