लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : नागपूर -मुंबई महामार्गावर माजी नगरसेवक प्रकाश चव्हाण यांच्या शेतात सोमवारी बेवारस बंदूक आढळून आल्याने खळबळ उडाली. पण पोलीस तपासात ही बंदूक खरी नसून ती एअर गन (छर्रा) असल्याचे निष्पन्न झाल्याने परिस्थिती शांत झाली.शेतात कट्टा सापडल्याची माहिती कळताच औरंगाबाद येथून श्वानपथक, स्थानिक गुन्हे शाखा व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रकाश चव्हाण यांच्या शेतात बंदुकीची तपासणी केली. या घटनेनंतर बेकायदा कट्टे, गावठी हत्यार तालुक्यात बोकाळल्याचे स्पष्ट होत आहे. औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील नांदगाव शिवारात तीन तरुणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून बंदूका व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी वैजापूर पोलिसांनी घटनेच्या तपशीलात गेल्यानंतर त्यामध्ये आंतरजिल्हा टोळी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सोमवारी नागपूर -मुंबई महामार्गावर शिवराई फाट्याजवळ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, संजय घुगे, सोमनाथ धादवड,अबूबकर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी बेवारस बंदूक जप्त केली.
वैजापूरनजीक शेतात सापडली बंदूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:40 AM