लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ट्रकचालक, प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, चोरी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी नगर, नाशिक व जालन्यात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.नगर व नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी चोरी, लुटमार करणारे फरार संशयित गणेश उर्फ शफ्या शंकर शिंदे (रा. शिकलकरी मोहल्ला. ह.मु. कालिकानगर, शिर्डी.) व सौरभ उर्फ बाबा विकी रोझारिओ (रा.ईनामवाडी, शिर्डी) चोरी करण्याच्या उद्देशाने जालन्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्यांनी दरेगाव शिवारात घरफोडी व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून तालुका ठाण्याच्या हद्दीत घरातून चोरलेले दागिने, सदर बाजार हद्दीत मोबाईल शॉपीतून चोरलेले दहा मोबाईल, मोबाईल डिस्प्ले, मोबाईल चार्जर, चार दुचाकी व एक एअर पिस्तूल असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, उपनिरीक्षक दिलीपसिंग ठाकूर, कैलास जावळे, प्रशांत देशमुख, विष्णू चव्हाण, भालचंद्र गिरी, कैलास कुरेवाड, रामेश्वर बघाटे, विष्णू कोरडे, वैभव खोकले, सूरज साठे यांनी ही कारवाई केली.
बंदुकीचा धाक दाखवून लुटणारे जेरबंद
By admin | Published: June 28, 2017 12:39 AM