गरम मसाला : हळद, खसखसने पदार्थांची बिघडविली चव
औरंगाबाद : तिखट पदार्थ खाणाऱ्यांना यंदा गुंटूर लाल मिरचीने दिलासा दिला आहे. कारण, मागील वर्षीच्या लॉकडाऊनमधील शिल्लक साठा व यंदाचे उत्पादन यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा गुंटूर मिरची कमी भावात विकली जात आहे. मात्र, हळद, खसखसच्या भाववाढीने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे.
उन्हाळा सुरू होताच महिला वर्गाची लगबग वार्षिक धान्य खरेदीकडे सुरू होते. सामनाच्या यादीत लाल मिरची, गरम मसल्याचा समावेश आवर्जून असतो. मराठवाड्यात तिखट खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, तसेच मसालेदार पदार्थही तेवढ्याच चवीने खाल्ले जातात.
यामुळे मार्च महिना सुरू झाल्यापासून लाल मिरची, गरम मसाला खरेदी करणे सुरू होते. वर्षभर पुरेल एवढा मसाला घरी करून ठेवला जातो. रेडिमेडच्या जमान्यातही घरी चटणी (मसाला) तयार करणाऱ्या सुगरणींची संख्या काही कमी नाही.
वार्षिक खरेदीत गहू, तांदूळ, नंतर लाल मिरचीचा नंबर लागतो. औरंगाबादेत जिल्हाभरातून, तसेच आंध्र प्रदेशातील गुंटूर व कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक होते; पण यात गुंटूर लाल मिरची जास्त विकली जाते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर मिरची शिल्लक आहे व यंदाचे नवीन उत्पादन यामुळे मागील वर्षीपेक्षा गुंटूर मिरची किलोमागे ३० ते ४० रुपये कमी होऊन १८० रुपये किलो या दराने विकली जात आहे. यामुळे तिखट पदार्थ खाणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
मात्र, मागील वर्षीच्या कमी उत्पादनामुळे हळद कडाडली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३० ते ५० रुपयांनी वधारून सध्या १५० ते १८० रुपये किलो विकत आहे. देशात खसखसचा कमी साठा व अजून आयातीला परवानगी न मिळाल्याने खसखसचे भाव कडाडले आहेत. मागील वर्षीपेक्षा किलोमागे ६०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. सध्या खसखस १५०० रुपये किलोने विकत आहे. मसाल्यासाठी लागणाऱ्या अन्य पदार्थांचे भाव जवळपास स्थिर आहेत.