‘शिक्षक’ आणि ‘गुरू’ यांच्यातील भेदांवर अनेक चर्चा घडत असतात. काही मोजकी माणसे या दोन्ही उपाधींना न्याय देत असतात. डोळे सर त्यापैकी एक. सरांशी माझा पहिला संबंध आला तो साधारण १९८८-८९ दरम्यान. मी ‘उदयगिरी’त कॉलेजचे भित्तीपत्रक चालवीत असे. प्रभुणे सरांच्या मार्गदर्शनाखाली भित्तीपत्रक तयार केले की, अंतिम स्वाक्षरी डोळे सरांची घ्यायची आणि ते नोटीस बोर्डावर लावायचे, असा नियम. सर डाव्या विचारांचे आणि मी उजव्या...! ‘आगाऊपणा’ म्हणून मी अनेक ‘प्रयोग’ करीत असे.
हिटलरच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी चक्क ‘हिटलर विशेषांक’ केला. सरांकडे सहीसाठी नेला. आधी ते चमकले. त्यांनी लेख बारकाईने वाचला. शांतपणे सही केली. एकच वाक्य बोलले, ‘असे विषय लिहायचे तर आधी बोलत जावं.’ त्यानंतर काही महिन्यांतच नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे रात्रीतून भित्तीपत्रक तयार केले आणि सकाळी सहीसाठी गेलो, तेव्हा त्यांनी कौतुक तर केलेच; पण चहाही पाजला. त्या काळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांला चहा देणे, हा मोठा बहुमान असे.
सरांचे मन मोठे होते. ते ज्या विचारधारेचा पुरस्कार करीत त्या विचारधारेच्या अन्य मान्यवरांकडे जे मला कधीही जाणवले नाही ते वेगळेपण डोळेसरांमध्ये जाणवत असे, ते म्हणजे विरोधी मताविषयीची सहिष्णुता आणि आदरभाव. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असे. उदगिरात तेव्हा विद्यार्थी परिषद आणि छात्रभारती अशी स्पर्धा असे. सर ‘छात्रभारती’चे आधारस्तंभ. तरीही आमच्या मोकळ्या गप्पा होत. कधी केबिनमध्ये तर कधी त्यांच्या घरी. घरी गेल्यानंतरही ‘कमल, दत्ता आलाय. चहा देतेस का?’ असे आत डोकावून सांगून माझ्याशी गप्पा रंगत. माझ्या मनातील विचारधारेबद्दलच्या कसल्याही शंका मी विचारत असे आणि सर अतिशय शांतपणे प्रतिवाद करीत, समजावून सांगत.
काश्मीरच्या संदर्भात मात्र काही वेगळे घडले. काश्मीरमधील पंडितांच्या विस्थापनाला १९८८ च्या दरम्यान प्रारंभ झाला. तेव्हा व्ही. पी. सिंग सरकार सत्तेत होते. वातावरण तापू लागले तेव्हा डोळे सर, जगन फडणीस आणि पन्नालाल सुराणा यांची समिती काश्मिरात जाऊन आली. ‘सारे काही आलबेल आहे’, असा अहवाल त्यांनी सरकारला दिला. त्यानंतर काही महिन्यांतच प्रचंड हिंसाचार झाला आणि लक्षावधी हिंदू पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले. त्या वेळच्या ‘काश्मीर बचाव’ आंदोलनात सहभागी होत मी काश्मिरात जाऊन आलो. तेथून आल्यानंतर त्या आंदोलनावर आधारित भित्तीपत्रक तयार केले. छायाचित्रे वापरली. हे सगळे त्यांच्या अहवालाची चिरफाड करणारे ठरले. तरीही हे भित्तीपत्रक त्यांनी कसलीही कुरकुर न करता नोटीस बोर्डावर लावण्यास परवानगी दिली. काही वर्षांनी चर्चेत मी त्यांच्या चुकीच्या अहवालाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी मोकळेपणाने, ‘तेव्हा आमची चूकच झाली’ हे मान्य केले. हा मोकळेपणा त्यांच्यात होता.
ते ‘प्राचार्य’ होते. ‘कुलगुरू’ होण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच होती. ज्या विचारधारेत ते वाढले, जी विचारधारा त्यांनी वाढविली त्या विचारधारेचे नेतृत्व आपल्याकडे दुर्लक्ष करते, आपल्याला ‘मोठे’ होण्याची संधी देत नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यातून अखेरच्या काळात जाणवत असे. ही खंत मनात ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. जयदेव आणि देवप्रिय या सरांच्या मुलांच्या सांत्वनासाठी मी उदगीरला सरांच्या घरी गेलो, तेव्हा खूप मोठी पोकळी जाणवत होती. माझ्या घरातील एखादी वडीलधारी व्यक्तीच देवाघरी गेल्याचे दु:ख मला जाणवत होते.
- दत्ता जोशी, औरंगाबाद