छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे ३ ते १८ वर्षांच्या मधील बालक, युवकांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची मुले, आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत घालू न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मागील ५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून, ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे.
५ जुलैपासून सुरूप्रत्येक बालकास शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे शासनाकडून शाळामध्ये न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही मुले कोणत्याही ठिकाणी असली तरी त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्थाही केली जाते. त्यासाठी मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे.
२० जुलैपर्यंत चालणार मोहीमशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू झाली आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे. ही मोहीम थांबल्यानंतर शाळाबाह्य मुलांची संख्या समोर येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
येथे करणार सर्वेक्षणमुलांचा शोध घेण्यासाठी स्थलांतरितांच्या घरी पाहणी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वीटभट्ट्या, हॉटेल्स, दगडखाणी, साखर कारखाने, बाजारतळ इ. ठिकाणी मुलांचा शोध घ्यायचा आहे, तसेच वंचित गटातील वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी, त्याशिवाय ग्रामीण भागातील गाव, वाड्या, तांडे, पाडे, शेतमळे, जंगलात राहणाऱ्या पालकांचा शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात समावेश करायचा आहे.
असे असेल नियोजनशाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, महापालिका किंवा नगरपालिकेतील प्रशासन अधिकारी, हे अधिकारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करतील. त्याशिवाय गावखेड्यापर्यंतही यंत्रणा लावण्यात आलेली आहे.
२० जुलैपर्यंत सर्वेक्षण जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू आहे. २० जुलैपर्यंत सर्वेक्षण होईल. त्यानंतर सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांची संख्या समोर येणार आहे. शाळाबाह्य मुले आढळल्यास संबंधितांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.- जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी.