मोबीन खानवैजापूर : तालुक्यात यावर्षी दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. त्यामुळे मजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या अनेक आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणापेक्षा पोटाच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य दिले. त्यामुळे तालुक्यातील १६४ गावांतून जवळपास दोन हजार विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कें द्र प्रमुखांमार्फ त अशा विद्यार्थ्यांची माहिती मागवून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांची मनधरणी करून त्यांच्या मुलांना गावात परत आणायचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.तालुक्यातील मन्याड खोरे व डोंगरथडी भाग ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. घरातील कर्ती मंडळी ऊसतोडीला गेल्यावर ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी गावात थांबत असत. गावी राहून शिक्षण पूर्ण करायचे, मात्र गेला पावसाळा कोरडा गेला. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. दुष्काळी परिस्थिती असल्याने शाळेतील विद्यार्थीही कामासाठी आई-वडिलांसोबत उसाच्या फडात तोडणीसाठी गेले आहेत.जगण्याच्या संघर्षात शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांवर आली आहे. दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा सुरू झाली; मात्र तालुक्यातील १६४ गावांतील प्रत्येक शाळेतून १५ ते २५ विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची कें द्र प्रमुख माहिती गोळा करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहेत.जि.प. शाळांची पटसंख्या रोडावलीयापूर्वीही मुले ऊसतोडीच्या हंगामात शाळेत गैरहजर राहत होती; मात्र हे प्रमाण खूप कमी होते. यावर्षी हे प्रमाण लक्षणीय आहे. दुष्काळामुळे यावर्षी विशेषत: मन्याड खोरे, डोंगरथडी व बरमळा येथील विद्यार्थ्यांनी शाळेकडे चक्क पाठ फिरवल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे मजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांची मनधरणी करण्यासाठी येथील शिक्षकांनी टीम बनवून थेट उसाच्या फडात जाऊन त्यांच्या मुलांना गावात परत आणायचे काम सुरू केले आहे. आजपर्यंत १०० पेक्षा अधिक बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षकांना यश आले आहे.हंगामी वसतिगृह सुरू कराआई-वडिलांसोबत ऊसतोडीसाठी गेलेल्या मुलांना गावात परत आणायचे काम शिक्षकांनी सुरू केले आहे; मात्र गावात आल्यानंतर या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांधे होत आहेत. त्यांच्यासाठी शासनाने तालुक्यात अद्याप एकही हंगामी वसतिगृह सुरू केले नाही; मात्र पोरांची आबाळ लक्षात घेऊन काही शिक्षकांनी स्वखर्चातून मुलांसाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था करून प्रशासनाच्या कारभाराला चपराक दिली आहे.शिक्षक स्वखर्चातून करताहेत विद्यार्थ्यांची सोयतालुक्यातील खंडाळा परिसरातील बरमळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रशासनाची वाट न पाहता मुलांची राहण्याची व जेवणाची स्वखचार्तून व्यवस्था केली आहे. त्यामुळे तेथील स्थलांतरित मजुरांच्या मुलांची सोय झाली आहे; परंतु या शाळेप्रमाणेच भादली, नारळा, पारळा, तलवाडा, लोणी, बिलोणी, जानेफळ, सुदामवाडीसह ५० ते ६० शाळांपुढे ही समस्या कायम आहे. त्यांना शिक्षण विभाग वसतिगृह सुरू करण्याचा आदेश कधी देणार, हा प्रश्न आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२४ शाळा असून, त्यापैकी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २७,७०५, नववी ते दहावीच्या वर्गात १,६६९ असे २९,३७४ विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी स्वीकारली बालरक्षकाची जबाबदारीतालुक्यात विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेपेक्षा ऊसतोडीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच्या शाळांच्या तुलनेत यावर्षी गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांनी बालरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी ऊसतोडीसाठी गेलेल्या बालकांना यापासून परावृत्त करून शिक्षणासाठी प्रवृत्त करून शाळेच्या अंगणात आणणे सुरू केले आहे.-मनीष दिवेकर, गटशिक्षणाधिकारी
पोटापाण्यासाठी २००० विद्यार्थी शाळा सोडून उसाच्या फडात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:20 PM