औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या नव्या कोऱ्या इमारतीत कामकाज सुरू होऊन अवघे काही महिने उलटत नाही तोच या इमारतीच्या चकचकीत भिंतीवर काही समाजकंटकांनी पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून विद्रूप केल्या आहेत. विशेष म्हणजे भिंतीवर पिचकाऱ्या मारताना कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता.
पोलीस आयुक्तालयाची निजामकालीन इमारत पाडून तेथे २२ कोटी रुपये खर्चून नुकतीच आयकॉनिक इमारत बांधण्यात आली. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आॅगस्टमध्ये झाले. आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले, तेव्हापासून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जनतेची वर्दळ वाढली.
सुबक, सुंदर, सुरक्षित इमारतीच्या भिंतीवर अन्य सरकारी कार्यालयांप्रमाणे पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता; मात्र त्यानंतरही काही जणांनी पिचकाऱ्या मारल्याच. पहिल्या मजल्यावरील कॉलम बीमवर आणि अन्य ठिकाणी भिंतीवर पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या आहेत. या पिचकाऱ्या कोणी आणि कधी मारल्या, हे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.