औरंगाबाद : ३७ वर्षीय युवकाला गुटख्यामुळे प्राणास मुकावे लागले. तोंडात गुटखा असताना ठसका लागून सुपारीचे खांड अन्ननलिकेत अडकून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) रात्री घडली. गणेश जगन्नाथ दास (३७, रा. पद्मपाणी, रेल्वे स्टेशन) असे मृताचे नाव आहे.
उस्मानुपरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे एका खाजगी कंपनीत मागील २० वर्षांपासून कामाला होते. कंपनी मालकाच्या घरी टीव्ही डिश बसविण्यासाठी गुरुवारी रात्री ते गेले होते. काम करताना गुटखा खाल्ला व जोराचा ठसका लागला. या ठसक्याने ते तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. घाटीत डॉक्टरांनी गणेश यांना तपासून मृत घोषित केले.
उस्मानपुरा पोलिसांना शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये जोराचा ठसका लागल्याने तोंडातील सुपारीचे खांड घशातून अन्ननलिकेत जाऊन अडकले, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार बी. ए. जाधव करीत आहेत. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.