औरंगाबाद : करमाड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेकटा शिवारात अनेक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने बुधवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत गोडाऊनमधून तब्बल ५२ लाख ३० हजार ६५२ रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख १८ हजार रुपयांचा प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याविषयी करमाड ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्रवीण संजय झंवर, संजय गोविंददास झंवर, गोपाल संजय झंवर (सर्व रा.शेकटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले की, औरंगाबाद-जालना रस्त्यावरील शेकटा येथील झंवर बंधूंच्या गोडाऊनमधून किरकोळ विक्रेत्यांना घाऊक दराने गुटखा विक्री केला जातो, अशी माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीची प्रथम खात्री करण्यात आली. यानंतर अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबत माहिती देऊन अप्पर अधीक्षक यांचे वाचक सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, चिकलठाणा ठाण्याचे उपनिरीक्षक जी. टी. राऊत, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप वानखेडे, दीपक सुराशे आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोडाऊनवर धाड टाकली. तेव्हा गोडाऊनमध्ये राजनिवास पानमसाला, जाफरानी जर्दा, गोवा प्रिमियम १०००, आर.एम.डी. पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखू, केशरयुक्त विमल पानमसाला आदी बंदी असलेल्या गुटखाच्या गोण्या आढळल्या. या गोण्यासोबतच एका कोपऱ्यात प्रतिबंधित सुमारे १ लाख १८ हजारांचे उडन गरम इंटरनॅशनल, ब्लॅक सिगारेटचे बॉक्स मिळाले. तेथे गुटखा असल्याचे निष्पन्न होताच अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व मालाचा पंचनामा केला. यावेळी गुटखा आणि सिगारेटची एकूण किंमत ५३ लाख ४८ हजार ७५२ रुपये असल्याचे समोर आले.
झंवर बंधंूवर यापूर्वीही कारवाईअप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या पथकाने ही धाड टाकून ५३ लाखांचा गुटखा आणि सिगारेट जप्त केला. शेकटा येथे झंवर बंधंूच्या घरासमोरच हे गोडाऊन होते. झंवर यांच्याविरुद्ध यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र यानंतरही त्यांनी गुटखा विक्री सुरूच ठेवल्याचे अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले.