दिलीप पारसमल संचेती (रा. राजाबाजार) आणि शेख अफरोज शेख फिरोज (रा. रेंगटीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईविषयी अधिक माहिती अशी की, राजाबाजार येथील सुशील फ्लोअर मिलचा फलक लावून आतमध्ये गुटखा, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि विदेशी सिगारेटचे गोडावुन असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना दिली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री अन्न व औषधी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, एस. व्ही. कुलकर्णी आणि एम. एम. सय्यद यांना सोबत घेऊन तेथे छापा टाकला. यावेळी तेथे आरोपी दीपक संचेती आणि त्यांचा नोकर शेख अफरोज शेख फिरोज उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना त्यांचा परिचय देउन आतमध्ये जाऊन पाहणी केली असता विविध गोण्यांमध्ये आणि बॉक्समध्ये प्रतिबंधित सिगारेट, सुगंधी तंबाखू आणि गुटखा आढळून आला. या सर्व मालाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. तेव्हा तेथे ११ लाख १६ हजारांचे सिगारेट, आर एम डी आणि गोवा कंपनीचा पाच लाख ६१ हजारांचा गुटखा आणि दोन लाख २२ हजार ९२५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा असा एकूण २० लाख २७ हजार १७९ रुपये किमतीचा माल जप्त केला.
पीठ गिरणीचा फलक लावून गुटख्याचे गोडावून; २० लाख २७ हजारांचा गुटखा आणि सिगारेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:04 AM