प्राप्त माहितीनुसार आरोपींनी त्यांच्या घरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू लपवून ठेवल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला दिली. सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, कर्मचारी नजीर पठाण, परभत म्हस्के, विजय भानुसे, नितीन धुळे आणि महिला कर्मचारी फातेमा शेख यांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अंजिठेकर, मोहम्मद सिद्दीकी यांच्यासह सायंकाळी आरोपीच्या घरावर छापा टाकला. यावेळी संध्या या एकमेव घरी होत्या. पोलिसांनी परिचय देऊनही त्या गेट उघडत नव्हत्या. यामुळे पोलिसांनी त्यांना गेटचे कुलूप तोडण्याचा इशारा देताच त्यांनी गेट उघडले. घराची झडती घेण्यासही त्यांचा विरोध होता. पोलिसांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता घरझडती सुरू केली तेव्हा एका खोलीला बाहेरून कुलूप होते. तेथे किरायादाराचे सामान असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या खोलीत जाऊन पाहिले असता. तेथे अनेक गोण्यांमध्ये प्रतिबंधीत आणि केमिकल मिश्रित तंबाखू लपवून ठेवल्याचे आढळून आले. या तंबाखूची किंमत ४ लाख ३० हजार ८८४ रुपये असल्याचे पोलिसांना समजले. पंचनामा करून पोलिसांनी तंबाखू जप्त केली. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच आरोपी सचिन मोबाईल बंद करून गायब झाला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.
सिडको एन ७ येथील घरातून गुन्हेशाखेने जप्त केला ४ लाख ३० हजारांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:05 AM