नळदुर्ग : हैद्राबाद येथून अहमदनगरकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा एक ट्रक नळदुर्ग पोलिसांनी जेरबंद केला़ ही कारवाई शनिवारी दुपारी नळदुर्ग नजीकच्या बुस्टरजवळ करण्यात आली असून, अंदाजे एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे वृत्त आहे़ गुटख्याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरू होती़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथून अहमदनगरकडे एका ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून पोउपनि अनिल किरवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी नळदुर्ग नजीकच्या बुस्टरजवळ सापळा रचून ट्रक (क्ऱएम़पी़ओ़ ०९- एच़एफ़६८२०) ताब्यात घेतला़ ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गुटख्याचा माल दिसून आला़ पोलिसांनी हा ट्रक ठाण्यात आणल्यानंतर प्ऱ अधिकारी मजहर सय्यद यांनी याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना माहिती देऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली़ ही कारवाई पोउपनि अनिल किरवाडे, पोना मनोज भिसे, नवनाथ डिगोळे, वाहन चालक शेख यांच्या पथकाने केली़ माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त टी. सी बोराळकर, अन्न सुरक्षा अधिकारी डी. यू. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नळदुर्ग ठाण्यात धाव घेतली़ या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद करण्यात येत होती़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खांडवे यांची उपस्थिती होती़ जप्त करण्यात आलेल्या या गुटख्याची रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरू असल्याने या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़
गुटख्याचा ट्रक जप्त
By admin | Published: March 05, 2017 12:33 AM