गंगापूर(छत्रपती संभाजीनगर) : तिरुमाला कंपनी सुरू आहे की, बंद हे पाहण्यासाठी आलेल्या वैजापूर तालुक्यातील ‘ज्ञानराधा’च्या खातेधारकांवर कंपनीच्या सुरक्षारक्षकाने छऱ्यांच्या रायफल(डबल बोर)मधून गोळीबार केला. यामध्ये डोक्याला छर्रे लागून एक खातेदार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर मार्गावर असलेल्या ढोरेगाव शिवारातील तिरुमाला कंपनीच्या प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधी फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट वैजापूर शाखेत लाखोंची गुंतवणूक केली आहे. मात्र, मल्टिस्टेट बंद पडल्याने या ठेवीदारांचे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने यापैकी पाच खातेधारक हे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर मार्गावर ढोरेगाव शिवारात असलेली कुटे यांची तिरूमला कंपनी सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी पोहोचले. त्यानंतर ‘आम्हाला कंपनीत प्रवेश द्या’ अशी मागणी ते सुरक्षा रक्षकाकडे करत होते. यादरम्यान तेथे कंपनीद्वारे नियुक्त शौर्य एजन्सीच्या योगेश बबन तनकुरे (डबल बोर परवाना धारक सेवानिवृत्त सैनिक (वय ४०, रा. आखेगाव, ता. शेवगाव, जि.अहमदनगर) या सुरक्षा रक्षकाने त्याच्याजवळील छर्रा बंदुकीने गोळीबार केला. त्यात शिवनाथ देविदास आहेर (३३, रा.नगिना पिंपळगाव, ता.वैजापूर) यांच्या डोक्याला व हाताला छर्रा चाटून गेल्याने ते जखमी झाले. त्यांच्या सोबतच्या इतर सहकाऱ्यांनी आहेर यांना जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा सुरक्षा रक्षक योगेश बबन तनकुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकानेही दिली पाच जणांविरुद्ध फिर्यादया घटनेतील आरोपी सुरक्षा रक्षक तनकुरे यांनीही पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अशोक देवरे (वय ३१, रा. लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर), पुष्पेंद्र कृष्णदास बापते (४३, नवजीवन कॉलनी, वैजापूर), ज्ञानेश्वर श्रीराम गायके (३२, रा.भिवगाव, ता.वैजापूर), योगेश सुभाष गायकवाड (३५, रा. गायकवाडवाडी, वैजापूर) यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व खासगी मालमत्तेत जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यात सुरू होती.