सोयगाव : परतीच्या पावसाचा सोयगाव तालुक्याला फटका बसला आहे. मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुकी नदीला पूर येऊन पाणी निंबायती गावात शिरल्याने शनिवारी गोंधळ उडाला होता. दरम्यान, पिक नुकसानीची पाहणी करणारे विमा, कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यांचे पथक सोयगाव शिवारातील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केल्याची माहिती आहे.
धिंगापूर आणि वेताळवाडी धरणातून धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने सोयगावच्या सोना नदीला महापूर आला होता,त्याच प्रमाणे निंबायती गावाजवळून वाहणाऱ्या सुकी नदीच्या पात्रानेही धोक्याची पातळी ओलांडल्याने निंबायती गावात पुराचे पाणी शिरल्याने या नदीकाठच्या निंबायतीगाव,रामपुरातांडा,निंबायती आणि जरंडी या चार गावांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोयगावच्या सोना नदीच्या पुराचे पाणी पुलाच्या टोकाला पोहचण्यासाठी फुटभर शिल्लक होते या महापुराचा शहरात पाच तास थैमान सुरु होते. निंबायती गावाच्या सुकी नदीच्या पात्राने अद्यापही पूर ओसरला नसून आदिवासी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.माजी सरपंच शमा तडवी,तोसीफ तडवी आदींच्या मदतकार्याने पूरग्रस्त ग्रामस्थांना सुरक्षित हलविण्यात आले असून तालुका प्रशासनाच्या पथकाने या गावात भेटी दिल्या आहे.
सोयगाव मंडळावर झालेल्या अतिवृष्टीने सोयगाव शहराचे वेताळवाडी आणि जरंडीचे धिंगापूर धरण धोकादायक बनले आहे. या धरणाच्या विसर्गाच्या पाण्याने सोना आणि सुकी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.अद्यापही सुकी नदीचा पूर ओसरला नसून सोना नदीचे पाणी कमी झाले आहे.