हिंगोली : जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला आणखी १७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, आता केवळ ८५ लाख रुपयेच शासनाकडून येणे बाकी आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे एकूण ३७ कोटी ६० लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार दोन टप्प्यात राज्य शासनाने जिल्ह्याला एकूण १९ कोटी रुपयांचा निधी यापूर्वी दिला. त्यानंतर आता १७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पुन्हा जिल्ह्याला देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३६ कोटी ७५ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले असून, फक्त ८५ लाख रुपये शासनाकडून येणे आता बाकी आहे. यापूर्वी आलेला निधी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व तालुक्यांना वितरीत केला होता. आता हाही निधी सर्व तहसील कार्यालयांना वितरीत केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
गारपिटीचे आणखी १७ कोटी ७५ लाख मिळाले
By admin | Published: May 15, 2014 11:40 PM