औरंगाबाद : मराठवाड्यात दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा २ हजार हेक्टरहून अधिक पिकांना फटका (Hailstorm hits Marathwada) बसला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाकडून पंचनामे करून घेण्याबाबत विभागीय प्रशासनाने सूचना केल्या आहेत.
दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन जनावरे गारपिटीमुळे दगावली आहेत.
३० सप्टेंबर रोजी सरत्या वर्षातील नियमित पावसाळा संपला. परंतु, त्यानंतरही विभागात पावसाने हजेरी लावलीच. दिवाळसणातही ढगाळ वातावरण राहिले. मध्येच काही दिवस थंडीचा जोर वाढला. त्यानंतर पुन्हा उन्हाचा पारा चढला. मागील दोन महिन्यांत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव आला आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विभागात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विभागातील सर्व जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली.
दोन जिल्ह्यांत दाणादाणऔरंगाबाद जिल्ह्यात ३९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर जालना जिल्ह्यातील १५४२.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली, जालन्यातील प्रत्येक एक दुधाळ जनावर दगावले आहे. इतर जिल्ह्यांतील नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत, असे विभागीय प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.