छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली. वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज पडून परभणी जिल्ह्यातील दोघांसह सहा जनावरांचा मृत्यू झाला.
गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील इळेगाव येथील शेतशिवारात शेतातील कापूस वेचून घरी निघताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नरेंद्र धोंडिबा शेळके (६५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चरण्यासाठी आलेल्या हरिबाई एकनाथ सुरनर यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. खपाट पिंपरी येथे किशोर खंदारे यांची शेळी व शेळगाव येथे गिरीश हल्गे यांचा बैल वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी तालुक्यातील साळापुरी गाव शिवारात बुधवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी दोन ठिकाणी वीज पडून एक गाय व दोन म्हैस दगावले.
बीड जिल्ह्यात विविध भागांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. धारूर, वडवणी व गेवराई तालुक्यांत गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. धारूर- वडवणी रस्त्यावर पहाडी दहीफळ येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक काही वेळ बंद होती.
लातूर जिल्ह्यात वीज पडून चार जनावरे दगावलीलातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील तीन गावांमध्ये वीज पडून चार जनावरे दगावली. या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी शहरासह देवणी, चाकूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औसा तालुक्यातील फत्तेपूर, किल्लारी, लामजना येथे वीज पडून चार जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर ज्वारी, द्राक्षास फटका बसला आहे, तसेच पशुधनासाठीचा कडबा भिजला आहे.
जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यासह जालना शहरालादेखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. भोकरदन तालुक्यास बसला आहे. केदारखेडा, आव्हान, सिपोरा बाजार, दानापूर, वडोद तांगडा या गावात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आव्हाना परिसरात झाड उन्मळून पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी ४ वाजेनंतर वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमधील शेत शिवारात गारांचा खच पडल्याचे पहावयास मिळाले. या गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळी व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.