लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हज यात्रा-२०१८ मधील भाविकांसाठी रविवारी जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे दुसरे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हज यात्रेकरूंना ‘उमरा’चे विधी कशा पद्धतीने असतात याची अत्यंत बारकाईने माहिती देण्यात आली.१३ मे रोजी दुसरे प्रशिक्षण शिबीर मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीतर्फे आयोजित करण्यात आले होते. मागील आठवड्यात शहरातील दंगलसदृश परिस्थितीमुळे ऐनवेळी हे शिबीर रद्द करण्यात आले होते. रविवार, २० मे रोजी दुसरे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या प्रारंभीच हाफेज जाकेर साहब यांनी पवित्र ‘कुराण’ पठण केले. हाफीज मुद्दसर यांनी ‘नात’सादर केली. मरकज-ए-हुज्जाज कमिटीचे कार्यकारी साजेद अन्वर यांनी ‘हज’आणि उमरा याचे महत्त्व विशद केले. त्यांनी ‘उमरा’करताना कोणत्या विधी आहेत. त्या कशा पद्धतीने पार पाडाव्यात याची इत्थंभूत माहिती दिली. हज करताना पोशाख म्हणजेच ‘एहराम’कशा पद्धतीने घालावे, याचीही माहिती दिली. पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारेही त्यांनी भाविकांना हजची माहिती दिली.मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष मौलाना नसीमोद्दीन मिफ्ताही यांनी हज, उमराचे महत्त्व विशद केले. त्यांनी मक्का, मदिना येथील विविध प्रक्रियेची माहिती दिली. हजच्या दरम्यान करण्यात येणारी कुरबानी या मुद्यावरही मार्गदर्शन केले. शिबिरात औरंगाबाद जिल्ह्यासह अहमदनगर, जालना, बीड, बुलडाणा, मालेगाव, परभणी येथील भाविक मोठ्या संख्येने हजर होते.
औरंगाबादेत हज यात्रेकरूंचे दुसरे प्रशिक्षण शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:19 AM