करमाड : कुंभेफळ फाट्याजवळ मंगळवारी सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. करमाड पोलीस आणि स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर मृत तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. शेख अमीर शेख नझीर (२२, रा. नारेगाव) असे मृताचे नाव आहे. त्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असून, स्थानिक गुन्हे शाखेने काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोनि. भागवत फुंदे यांनी सांगितले. धारदार शस्त्राने गळा कापून मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याला जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
जलना रोडवरील कुंभेफळ पाटीपासून १२० फूट अंतरावर मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोनि. संतोष खेतमाळस सपोनि. प्रशांत पाटील हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. भागवत फुंदे, पोउपनि. संदीप सोळुंके, गणेश राऊत, श्रीमंत भालेराव, धीरज जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासचक्र गतीने फिरवत दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटवली. मृत शेख अमीर शेख नझीर हा नारेगाव येथील रहिवासी असून, त्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी होती. अवैध मार्गाने दारू, गांजा विकणे आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे पोनि. फुंदे यांनी सांगितले. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो ओळ
कुंभेफळ पाटीजवळ घटनास्थळाची पाहणी करताना करमाड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी.