बीड : जिल्ह्यातील शिक्षकांना मागील साडेचार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. आॅनलाईन वेतनप्रणालीचे काम रेंगाळल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निम्म्या शिक्षकांचे आॅनलाईन तर निम्म्यांचे आॅफलाईन वेतन काढले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या २१५० इतकी आहे तर माध्यमिक शाळांची संख्या ५३ इतकी आहे. या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या १७ हजारच्या घरात आहे. मे २०१४ पासून जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन अदा झालेले नाही. शिक्षकांचे वेतन आॅनलाईन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांनी विशिष्ट माहिती आॅनलाईन नोंदवायची होती. या कामातील काही तांत्रिक बाबी अजून पूर्ण व्हायच्या आहेत. त्यामुळे सप्टेंबर उजाडला तरीही शिक्षकांचे वेतन झालेले नाही. वेतन नसल्याने शिक्षकांची उपासमार होत आहे. पतसंस्थेचे कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. मुलांचे शिक्षण, विवाह या कामांतही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्रीराम बहीर यांनी दिला आहे. त्यांनी सोमवारी सीईओ राजीव जवळेकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या वेतनाबाबतची कैफियत मांडली.वेतनअदा करण्याचे आदेशसीईओ राजीव जवळेकर म्हणाले, शिक्षकांच्या आॅनलाईन वेतनात काही तांत्रिक बाबींची अडचण आहे. त्यामुळे तूर्त निम्म्याच शिक्षकांचे वेतन आॅनलाईन होईल. त्यामुळे निम्म्या शिक्षकांचे वेतन आॅफलाईन काढले जाणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याचेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
निम्म्या शिक्षकांचे वेतन ‘आफलाईन’!
By admin | Published: September 16, 2014 12:29 AM