औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांसह निवासी डॉक्टर, फार्मसिस्टची निम्मी पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्त पदांमुळे कामाचा ताण अन्य डॉक्टरांवर येत असून, पर्यायाने रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम होत आहे. घाटी रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी तेथे वर्ग-१ दर्जाच्या डॉक्टरांची १२५ पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तेथील नेफ्रालॉजी, हृदयरोगचिकित्साशास्त्र आदी सुपर स्पेशालिटी विषयांतील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. सूत्रांनी सांगितले की, रुग्णालयासाठी प्राध्यापकांची सहा पदे मंजूर असून, त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत. सहायक प्राध्यापकांच्या मंजूर १२ पदांपैकी केवळ दोनच पदे भरण्यात आली आहेत. सहायक प्राध्यापकांची १७ पदे मंजूर असून, ३ पदे रिक्त आहेत. याशिवाय निवासी डॉक्टर्स, औषध निर्माता, मेट्रन, अशा वर्ग-१ दर्जाच्या अधिकार्यांची ४८ पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम तेथे कार्यरत असलेल्या अन्य डॉक्टरांवर कामाचा ताण वाढण्यात होत आहे. रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. बाह्यरुग्ण विभागात तर सकाळी येणार्या डॉक्टरांना दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्ण तपासावे लागतात. कामाचा अतिरिक्त बोजा पडत असल्याने काही डॉक्टरांना रजाही घेता येत नाही. निवासी डॉक्टरांना तर रात्रं-दिवस वॉर्डात राहावे लागते. वरिष्ठांचे आदेश असल्याने बर्याचदा त्यांना वॉर्डातच झोपावे लागते. परिणामी डॉक्टर मंडळी तणावातच काम करीत असतात. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत भांडणही होते. रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी प्रशासनाकडून फारसा पाठपुरावा होताना दिसत नाही.
घाटी रुग्णालयातील वर्ग-१ डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त
By admin | Published: May 19, 2014 1:26 AM