लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शुक्रवारी मध्यरात्री भरून घेत हॉलतिकीट दिले. मात्र, यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांनीच शनिवारी परीक्षा दिली असल्याची माहिती प्रभारी परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षेसंदर्भात केलेला प्रताप परीक्षेच्या पहिल्या दिवशी उघडकीस आला. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पाठविण्यात आले नव्हते. विलंब झालेला असल्यामुळे अति विलंब शुल्काचे १,६०० रुपये लागणार होते. हा दंड भरण्याऐवजी या सत्राची परीक्षा पुढील वेळी देऊत, अशी भूमिका घेतली. मात्र, परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी परीक्षेसाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. याची कुणकुण प्रसारमाध्यमांना लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. परीक्षा संचालकांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले. यातच पहिला पेपर संपला होता. जर विद्यार्थ्यांनी पहिले सत्र दिले नसेल, तर दुसºया सत्राची परीक्षा देता येत नाही, असा नियम आहे. यामुळे एक दिवसाची परीक्षा संपली असली तरी अति विलंब शुल्काची रक्कम भरून दुस-या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याची तयारी परीक्षा विभागाने केली होती. यासाठी सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आणि विलंब शुल्क भरण्यास सांगितले. यावरही महाविद्यालयाने सायंकाळपर्यंत काहीच कार्यवाही केली नाही. शेवटी संस्थाचालक आमदार अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह कर्मचा-यांना सोबत घेऊन विद्यापीठात धाव घेतली. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यासोबत चर्चा करीत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या, सर्व विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क भरण्यास तयार असल्याचे रात्री ९ वाजता स्पष्ट केले. यासाठी १६९ विद्यार्थ्यांच्या विलंब परीक्षा शुल्कापोटी ५० हजार रुपये तात्काळ भरण्यात आले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी हमीपत्र दिले. यानंतर परीक्षा विभागाने तत्परता दाखवत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेत मध्यरात्री १२ वाजता हॉलतिकीट दिले. यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांनीच शनिवारी परीक्षा दिली आहे. यातील पहिले दोन पेपर न देणाºया विद्यार्थ्यांनी पुढील एक जरी पेपर दिला तरी ते दुसºया सत्रासाठी पात्र ठरत असल्यामुळे आ. सत्तार यांनी सर्वच विद्यार्थ्यांचा दंड भरण्याची भूमिका घेतली.‘त्या’ केंद्रावर सहकेंद्रप्रमुखच नाहीविद्यापीठ प्रशासनाने ऐनवेळी परीक्षा केंद्र दिलेल्या स्व. कमलनारायण जैस्वाल महाविद्यालयाला शनिवारी भेट दिली. तेव्हा पहिल्या दिवशीपेक्षा वेगळे चित्र पाहावयास मिळाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली, तर याच महाविद्यालयात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानावर बसून शिकावे लागले. मात्र, शनिवारी विद्यार्थ्यांची संख्या सकाळ आणि दुपारच्या सत्रात विभागल्यामुळे नियोजन करता आले. सहा खोल्यांमधील बाकड्यांवर परीक्षार्थी दाटीवाटीने बसल्याचे पाहणीत आढळून आले. यावेळी विचारपूस केली असता, विद्यापीठाने सहकेंद्रप्रमुख पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले.
मध्यरात्री दिले १६९ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:51 AM