खुलताबाद : वेरूळ येथील घृष्णेश्वर विकास आराखडा योजनेचे काम केवळ अतिक्रमणामुळे रखडल्याचे वृत्त लोकमतने ६ फेब्रूवारी रोजीच्या अंकात प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत ताराकिंत प्रश्न उपस्थितीत केल्याने जिल्हाधिकारी व पोलीस ग्रामीण अधीक्षक यांनी सोमवारी तातडीने बैठक घेत अतिक्रमणवर कारवाईचे आदेश दिले. यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून गट नंबर चार मधील अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्याचे काम सुरू आहे.
वेरूळ येथे राज्य शासनाने वेरूळ विकास आराखडा योजनेच्या कामास वर्षभरापुर्वी मंजूरी दिली होती मंजूर ११२ कोटी रूपयाची कामे करण्यात येणार असली तरी प्रत्यक्ष १८ कोटी रूपये निधी प्रारंभी दिला होता. गट नंबर ४ मधील २२ एकर जमिनीत या विकास योजनेची कामे सुरू होणार होती. पंरतू जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते. प्रशासनाने दोनदा अतिक्रमण काढले पंरतू अतिक्रमणधारक परत या ठिकाणी येवून बसत असल्याने घृष्णेश्वर विकास आराखड्याचे काम रखडल्याने प्राप्त १८ कोटी रूपये निधी मार्च अखेर पर्यंत खर्च न झाल्यास परत जाणार असल्याचे वृत्त लोकमतने दिं. 6 फेब्रूवारीच्या अंकात प्रसिध्द केले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत विधानपरिषदेचे आ. अंबादास दानवे यांनी विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ताराकिंत प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतचे वृत्त ही लोकमतने नुकतेच प्रसिध्द केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवार दिं. २ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घृष्णेश्वर विकास आराखडा योजनेबाबत बैठक झाली व या बैठकित गटनंबर ४ मधील विकास आराखड्याला अडथळा ठरणारे दोन एकर जमिनी वरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आज मंगळवार रोजी सकाळी आठ वाजताच उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते , उपविभागीय पोलीस अधिक्षक जगदीश सातव ,पोलीस उपअधीक्षक गृह, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकासअधिकारी डॉ.द्यानोबा मोकाटे, उपअभियंता सा.बां. एस.जी.केंद्रे , पोलीस निरिक्षक एस.एम. मेहत्रे , ६० पोलीस कर्मचारी,दंगा काबू पथक, क्यू.आर.टी.( जलद कृतीदल) पथक असा फौजफाटा घेवून प्रशासनाने ६० लोकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु केली. या २२ एकर जमिनीत अनेकांनी विहिर खोदून बागायती जमीन केली आहे. आज सकाळीच या अतिक्रमणावर प्रशासनाने हातोडा चालवून परिसरातील साहित्य चार ते पाच जेसीबी मशीनच्या साह्याने उखडून टाकून ट्रँक्टर मध्ये भरून खुलताबाद तहसील कार्यालय आवारात आणून टाकले आहे.