जालना : जुना जालन्यातील भाजीमंडईतील (बाजार चौकी परिसर) ६२ अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली. नगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळपासूनच या भागात दाखल होऊन नालीच्या बाहेर आलेल्या ओट्यांवर हातोडा मारला. दुपारी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसमवेत काही विक्रेत्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु उपनगराध्यक्ष शाह आलम खान यांच्या मध्यस्थीनंतर तो निवळला.सकाळी ११ वाजेपासून नगरपालिकेचे २० व पोलिस पथकातील २५ जणांच्या संयुक्त पथकाने सर्वप्रथम लतीफशाह बाजार मार्गावर दुकानांसमोर दुतर्फा बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांना तेथून उठवण्याची सूचना करण्यात आली. विक्रेत्यांनीही लगेच आपला माल घेऊन तेथून काढता पाय घेतला. दोन्ही बाजूने नालीबाहेर आलेले ओटे कुदळ, टिकास व सब्बलच्या मदतीने पाडण्यास सुरूवात झाली. काही विक्रेत्यांनी सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या भागात रहिवाशी म्हणून कुणाची घरे नाहीत, या रस्त्यावर पाणी साचत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे होते. परंतु स्वच्छता निरीक्षक लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्या मोकळ्या कराव्याच लागतील, अशी भूमिका घेतली. दुपारी याच मुद्यावरून काही विक्रेत्यांशी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा किरकोळ वाद झाला. परंतु त्यावेळी उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. बाजार चौकी ते जाफरखान चौकापर्यंत ४० तर बाजार चौकी ते मुजाहिद खान चौकापर्यंत २२ दुकानांचे ओटे या पथकाने पाडले. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. याबाबत स्वच्छता निरीक्षक लोंढे म्हणाले, बाजार चौकी परिसरात अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु त्यांनी स्वत:हून अतिक्रमणे हटविली नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी गतवर्षी येथील अतिक्रमणे हटविण्यात आली होती, परंतु काही विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमणे केली. पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. २०१४ मध्ये भाजीमंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. परंतु येथे पुन्हा अतिक्रमणे झाली. या अतिक्रमणांमुळे बाजारात खरेदीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग बरवार गल्ली, टाऊन हॉलकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.
भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा
By admin | Published: February 15, 2015 12:47 AM