विहिंपचा आरोप : लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच वारीत प्रवेश द्या
औरंगाबाद : संपूर्ण देशात लसीकरण सुरु आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. हजारो लोक रस्त्यावर बिनधास्त वावरत आहेत. शेकडो लोकांच्या साक्षीने लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. हॉटेल, माॅल्स, दारूची दुकाने सुरु आहेत; मात्र पंढरीच्या वारीवरच निर्बंध का? कोरोना नियमाच्या अडून वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी केला.
पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत संपर्क प्रमुख हभप जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीची ७५० वर्षांची परंपरा आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या ३६० वा पालखी सोहळा आहे. मानाच्या प्रत्येक वारीसोबत किमान ५०० जणांना पायी वारीची परवानगी द्यावी. ज्या वारकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे, अशांनाच परवानगी द्यावी. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी वारकरी गावाऐवजी माळरानात मुक्काम करतील, परवानगी दिल्यानंतर वारकरी शिस्त पाळणार नाहीत अशी शंका असेल तर राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी हभप अण्णा देशटवार, हभप जनार्दन महाराज, प्रांत सहमंत्री रामदास लहाबर, राजीव जहागिरदार यांची उपस्थिती होती.