औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनी भुईसपाट केली. मात्र, या दरम्यान किले अर्कची ऐतिहासिक तटबंदीही पाडण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतिहासतज्ज्ञ दुलारी आणि रफत कुरेशी दाम्पत्याने तटबंदी नष्ट होत असल्याचे पाहून विरोध सुरू केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाने ३५० वर्षं जुनी तटबंदी पाडायचे काम सुरूच ठेवल्याने इतिहास अभ्यासकांनी संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी एकत्रित मोहीम राबवत बुधवारी सकाळी ६.३० वाजता ७० वर्ष जुन्या लेबर कॉलनीवर बुलडोझर फिरवला. या ठिकाणी आता मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय इमारत उभा राहणार आहे. मात्र. लेबर कॉलनीच्या जवळ असलेली किले अर्कची ऐतिहासिक तटबंदी देखील यावेळी पाडण्यात आली. हे लक्षात येताच इतिहासतज्ज्ञ कुरेशी दाम्पत्याने याला विरोध केला. मात्र तरीही पाडापाडीची कारवाई सुरूच होती. शहराची ऐतिहासिक ओळख आता बोटांवर मोजता येईल अशा थोड्या वास्तूंवर टिकून आहे. यातच ३५० वर्ष जुनी तटबंदी पाडल्याने शहराचे मोठे नुकसान झाले झाल्याच्या भावना व्यक्त करत प्रशासनाला शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही का ? असा सवाल इतिहास अभ्यासक तथा गडकिल्ले संवर्धन समितीचे माजी सदस्य संकेत कुलकर्णी यांनी केला आहे.
शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होतोय खासगेट पाडले, खूनी दरवाजा गेला, रणछोडदास हवेली आणि दमडी महाल जमीनदोस्त झाले. फाजलपुऱ्याचा पूल गेला, थत्ते नहराचा बळी घेतला, मेहमूद दरवाजा होत्याचा नव्हता झाला, किले अर्क संपवला. आता उरलीसुरली तटबंदी पाडण्यात आल्याने पर्यटनाच्या राजधानीत ऐतिहासिक काय उरणारम असा संताप इतिहास अभ्यासकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारावर प्रशासन, हेरिटेज कमिटी काहीच बोलत नाहीत असा आक्षेप अभ्यासकांनी घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संवर्धनाचे आदेश दरम्यान, तटबंदी पडल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली. तसेच तटबंदीच्या संवर्धनाचे आदेश दिले.