छत्रपती संभाजीनगर : शहरात अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांच्या आसपास १०० मीटरपर्यंत गुटखा, सिगारेटची विक्री सुरू आहे. या ठिकाणी बसणारे टवाळखोर मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारपासून मनपा, पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. दोन दिवसात दहापेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. टपऱ्या, हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात चहा, नाष्टा विक्रेते, पानटपऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी बळीराम पाटील हायस्कूल येथे कारवाई करण्यात आली. कारवाईत तीन चहा नाश्ता सेंटरचे शेड, एक पाणीपुरीची हातगाडी तसेच चिप्स विक्रेत्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी विवेकानंद कॉलेज येथील पाच चहा व नाश्ता सेंटरचे शेड तोडण्यात आले. दहा लोखंडी बाकडे व चार लोखंडी टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, कुणाल भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.