औरंगाबाद : शहागंजमधील स्टेट टॉकीजच्या लगत मदीना मार्केटमधील पार्किंगच्या जागेवर उभारलेली छोटी-छोटी पक्की दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी जमीनदोस्त केली.
महापालिकेकडे यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आली. यावेळी झालेल्या विरोधाला न जुमानता मनपाने कारवाई केली.
३० बाय १५ या चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. सिटी सर्व्हे नंबर १०२१३/२ प्रेमचंद प्रताप सुराणा जीपीएधारक यांनी आकृती कन्स्ट्रक्शनमार्फत ही जागा फिरोजउद्दीन आयाजतर्फे विकसित केली. मार्केटमध्ये दुकाने, निवासी घरे आहेत. या ठिकाणी वाय. एस. ड्रायफ्रूट आणि जिया मसाल्याचे मोहम्मद अलीम पटेल यांनी त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील भागात भागात ३० बाय १५ या आकाराच्या जागेवर लॉकडाऊन काळात बांधकाम करून पार्किंगची जागा बंद केली होती. इमारतीमधील नागरिकांनी मनपा प्रशासक यांना निवेदन सादर केले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी स्थळपाहणी करून २६ ऑगस्ट रोजी नोटीस दिली होती. अतिक्रमणधारकांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता. त्यामुळे कारवाई करण्यात आली. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, मंगल सिंह राजपूत, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, पी. बी. गवळी, मजर अली, सुरासे, पोलीस निरीक्षक फहीम हाश्मी यांनी केली.