बापू सोळुंके
औरंगाबाद येथून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील शामवाडी शिवारातील एका शेतात एक हात बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली. अनेक वर्षापासून शेतात पडून असल्याने हा बॉम्ब गंजलेला होता,शिवाय तो स्फोटक नसल्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने केलल्या तपासणीत आढळून आल्याने सर्वाचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या घटनेविषयी पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी गावातील रहिवासी गोपालसिंग घुनावत यांच्या शेतात त्यांची मुले खेळत होती. यावेळी शेतातील माती, दगड उकरत असताना त्यांना सिनेमात दिसतो, तसा बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्यांनी ही वस्तू तशीच तेथे ठेवली आणि या घटनेची माहिती गोपाल घुनावत यांना दिली. यानंतर त्यांनी गावाचे पोलीस पाटील मानसिंग राजपूत आणि फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र निकाळजे यांना कळविली. पोलसांनी तेथे धाव घेतली तेव्हा तो जुना हॅण्ड ग्रेनेड (हात बॉम्ब) असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी लगेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला तेथे पाचारण केले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने या बॉम्बची तपासणी केली. या तपासणीत हा हातबॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला. हा बॉम्ब पूर्णपणे गंजलेला असल्याने बॉम्बची निर्मिती कधी आणि कोणत्या ऑर्डिनन्स कारखान्यात झाली, याविषयी समजू शकले नाही. हा बॉम्ब जप्त करण्यात आला असून याघटनेची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली.
हा हातबॉम्ब तेथे कसा आला?
शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवरील या छोट्या गावातील शिवारात हातबॉम्ब कसा आला, किती वर्षापूर्वीचा हा बॉम्ब आहे, एवढी वर्ष तो कोणाच्याही नजरेत कसा पडला नाही,असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते निजामकालीन हा बॉम्ब असू शकतो. मात्र काळाच्या ओघात तो जमीनीखाली दबला गेला असावा, शेतात नागरणी करताना तो वर आला असाता आणि आज दगड, माती उकरताना हा बॉम्ब मुलांना दिसला. स्फोटक नसल्याने हा बॉम्ब तेथे टाकला असावा.