औरंगाबाद : सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. परिणामी, या भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
देवळाई तसेच सातारा गावाशिवाय इतरही वसाहती निर्माण झाल्या असून, त्यांना पाणीपुरवठा देणे आवाक्याबाहेर असल्याने शासनाचा निधी व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास निधीतून शेकडो हातपंप घेतले आहेत. येथे पाणी मिळण्याची कुठलीही अन्य व्यवस्था नसल्याने सार्वजनिक हातपंपावर नागरिकांची तहान भागत होती. बांधकाम व्यावसायिकांनी घरासमोर बोअर, असे हजारो हातपंप खोदून दिलेले आहेत. कॉलनी व सोसायटीच्या समोरील सार्वजनिक हातपंपावरून पाणी भरण्यास रांगा लागत होत्या. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच हातपंप सुरू असून, उर्वरित दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत.
मनपात दोन्ही गावांचा परिसर समाविष्ट झाल्यापासून एकाही हातपंपाची दुरुस्ती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. पाणीपुरवठ्यासाठी मनपाने टँकरच्या बुकिंग व रक्कम भरण्याच्या कामाला सातारा देवळाई वॉर्ड कार्यालयात मंजुरी दिलेली आहे; परंतु जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे.
किरकोळ दुरुस्त्यासातारा-देवळाईत शेकडो हातपंप असले तरी त्याची नोंददेखील मनपाने घेतलेली नाही. हातपंपाच्या साखळ्या, दांडे तुटल्याने ते बंद असून, काही पंपांची दुरुस्ती करून पाणीपुरवठ्यासाठी ते खुले केल्यास नागरिकांची भटकंती थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीअभावी मोडकळीस आलेल्या जुन्या हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपाच्या अधिकाºयांकडे करण्यात आल्याचे नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले.
संघर्ष किती दिवससातारा-देवळाईतील नागरिकांना अजून किती दिवस पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील पर्यायी पाणीपुरवठ्याचे हातपंप दुर्लक्षित असून, त्याकडे मनपाने अद्याप ढुंकूनही पाहिलेले नाही, तसेच जुन्या विहिरींचे पाणी आटल्याने टँकरच्या पाणीपुरवठ्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही, असे माजी सरपंच करीम पटेल म्हणाले.