शेंद्रा : पाण्याचे टँकर घरासमोर येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी रविवारी शेंद्रा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढला. सरपंच शुभांगी तांबे यांनी आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.
शेंद्रा कमंगर येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. २४ हजार लिटर पाणी घेऊन १० टायर टँकर गावात जाण्यासाठी अडचण येत असल्याने टँकर गावाच्या एका बाजूला उभे करण्यात येते. त्यामुळे गावातील अर्ध्या महिलांना दूर अंतरावरून पाणी डोक्यावर आणण्याची वेळ येत आहे. शिवाय अंतर जास्त असल्याने पुरसे पाणीसुद्धा मिळत नसल्याने महिलांमध्ये असंतोष पसरला होता. पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी अखेर संतप्त झालेल्या महिलांना रविवारी ग्रामपंचायत कार्यलयावर हंडामोर्चा काढला. त्यानंतर सरपंच शुभांगी तांबे यांनी महिलांची समजूत काढली व महिलांनी आपला मोर्चा मागे घेतला.
१० टायरचे मोठे टँकर गावात येण्यास अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी यात्रेच्या मीटिंगमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. शिवाय पोलीस अधीक्षक यांना आम्ही पत्र दिले आहे; परंतु दोन्ही यंत्रणांकडून सहकार्य मिळाले नाही. आजसुद्धा आम्ही टँकर गावात जाण्याच्या दृष्टीने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले; परंतु त्याठिकाणी वाद उपस्थित होऊ लागले. त्यामुळे आम्हाला आमची मोहीम बंद करावी लागली, असे सरपंच शुभांगी तांबे यांनी सांगितले.