औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हँडबॅगवरील सुरक्षा तपासणी लवकरच टॅगविरहित होण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. आगामी आठ दिवसांत टॅगमुक्त हँडबॅगवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यामुळे टॅगवर स्टॅम्प मारण्यासाठी प्रवाशांचा जाणारा वेळही वाचणार आहे.
विमानतळावर विमान प्रवाशांचे लगेज बॅग आणि हँडबॅग, असे सामान असते. यामध्ये हँडबॅग नेण्यासाठी तिच्यावर टॅग लावूून स्टॅम्प घ्यावा लागतो. अनेकदा घाईगडबडीत स्टॅम्प मारायचे राहून जाते. त्यातून प्रवाशांना परत विमानतळावर यावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. विमान प्रवास आरामदायी आणि कमी वेळेचा असला तरी या गोष्टी प्रवाशांना त्रासदायक वाटतात. हवाई सुरक्षाप्रणालीत आंतरराष्ट्रीय प्रचलित पद्धती राबविण्याच्या दृष्टीने दिल्ली, मुंबईसह महानगरातील विमानतळावर हँडबॅगेवरील टॅगवर स्टॅम मारण्याची पद्धत बंद केली आहे. याच धर्तीवर चिकलठाणा विमानतळावरही याची चाचपणी सुरू आहे. टॅग आणि स्टॅम्पची आवश्यकता राहणार नाही, यादृष्टीने विमानतळावर सात दिवसांसाठी प्रायोगित तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावरहँडबॅगवर टॅग लावण्यासाठी जो वेळ लागतो, तो वाचू शकेल; परंतु सध्या हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे, अशी माहिती चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.