औरंगाबाद : दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवून गोरगरिबांकडून कोट्यावधी रुपये जमा करून फरार झालेला रिदास इंडिया कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगळुरू येथे पकडले. मोहम्मद अनिस आयमन असे पकडलेल्या संचालकाचे नाव आहे. २०१७ ते २०१९ या काळात शहरातील ६० ते ७० जणांकडून २ कोटी २२ लाख रुपये उकळले होते.
मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख यांनी १३ डिसेंबर २०१९ रोजी सिटीचौक ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रिदास इंडीया कंपनी, बंगळुरू ही नोंदणीकृत आहे. संचालक मोहम्मद आयुब हुसैन, मोहम्मद अनिस आयमन यांनी कंपनीचे कार्यालय जुना बाजार रोड येथे उघडले होते. शहरातील हॉटेलमध्ये सेमीनार घेवुन गुंतवणुकदारांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून नागरिकांनी कंपनीत मोठया प्रमाणात गुंतवणुक केली. सुरूवातीस काही दिवस परतावा दिला. मात्र, २०१९ नंतर गुंतवणुकदारांना मुळ रक्कम, परतावा न देताच कंपनीने कार्यालय बंद केले.
गुन्हा नोंदविल्यांनतर आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. आरोपीला पकडण्यासाठी तपास अधिकारी सपोनि तृप्ती तोटावार, अंमलदार विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबा भानुसे यांनी अनेकवेळा बंगळुरू गाठले. मात्र, आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. मोबाईल, ईमेल आयडी बंद केल्यामुळे मिळुन येत नव्हते. त्यामुळे सपोनि तोटावर यांनी आरोपीच्या संपर्कातील मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संचालक मोहम्मद अनिस आयमन याला अटक केली. ही कामगिरी निरीक्षक दादाराव सिनगारे यांच्या मार्गदर्शनात सपोनि तृप्ती तोटावार, अंमलदार मानकापे, जाधव व भानुसे यांच्या पथकाने केली.
आरोपीस पोलिस कोठडी
आरोपीस मोहम्मद अनिस आयमान यास अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने आरोपीला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली. रिदास इंडीया कंपनीविरुद्ध ठाणे, नवी मुंबई व बुलढाणा येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
६० एकर जमीन घेतली
आरोपींनी गुंतवणूकदारांच्या पैशातुन सिद्धनाथ वडगांव येथे ६० एकर जमीन खरेदी केली आहे. पोलिसांनी जमीन जप्त केल्यानंतर तिचा लिलाव करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.