कोरोना काळातून सावरण्यासाठी कलावंतांनी एकत्र यावे, कला सादरीकरण आणि चर्चा करून नवी उमेद घ्यावी, या उद्देशाने एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस्च्या वतीने दि. ५ रोजी कलावंतांचे स्नेहमिलन आयोजित करण्यात आले होते. शॉर्टफिल्मचे प्रदर्शन, चर्चासत्र, कलावंतांचा सत्कार आणि नाटकाचा प्रयोग, असा भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आला.
सकाळच्या सत्रात योगेश इरतकर दिग्दर्शित ‘चाळिशीतील ती’, अनिलकुमार साळवे दिग्दर्शित ‘पंधरा ऑगस्ट’, गणेश मुंढे दिग्दर्शित ‘साहेब’, सुनील देवरे दिग्दर्शित ‘मुरत’, गणेश शिंदे दिग्दर्शित ‘अजून चालतोच वाट’, प्रदीप पवार दिग्दर्शित ‘बातमी’, नितीन दीक्षित दिग्दर्शित वेब सिरीज, विवेक खराटे दिग्दर्शित ‘सुंदरी’, श्रुती कुलकर्णी दिग्दर्शित ‘मिसिंग द अन टोल्ड’ आणि भारत पंडित दिग्दर्शित ‘घुसमट शिक्षणाची’ या लघुपटांचा रसिकांनी चित्रपती डाॅ. व्ही. शांताराम चित्रपटगृहात आस्वाद घेतला.
दुपारच्या सत्रात डॉ. जयंत शेवतेकर, प्रमोद सरकटे, प्रेषित रुद्रावार आणि शिव कदम यांनी कोरोनात्तर काळात चित्रपट, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलावंतांसमाेर असलेली आव्हाने आणि उपाय या विषयावर विचार मांडले.
संध्याकाळच्या सत्रात एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ज्येष्ठ गाेंधळी प्रभाकर धुमाळ, ज्येष्ठ तबलावादक जयराम गोसावी, ज्येष्ठ नाट्य तंत्रज्ञ जगन्नाथ प्रांजे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. दिलीप घारे, डॉ. जयंत शेवतेकर, नंदू काळे, सचिन अनर्थे यांची उपस्थिती होती. यानंतर चिन्मय मांडलेकरलिखित आणि मनोज ठाकूर दिग्दर्शित ‘समुद्र’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. अनेक महिन्यांनंतर नाटकाचा प्रयोग पाहून रसिक सुखावले.
फोटो ओळ :
एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस्च्या वतीने आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेले कलावंत.