जालना : राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात मूठभर धान्य...एक वही...एक पेन या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. गहू, तांदूळ, डाळ, ज्वारी , बाजरी , पीठ असे सर्व मिळून ६६० किलो धान्य १५० वही व ३१० पेन अशी मदत करण्यात आली. राष्ट्रीय हिंदी प्राथमिक विद्यालयातही इयत्ता पहिली ते ४ थी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळ मिळून ११० किलो धान्य ६५ वही व ७० पेनची मदत केली. एका मुलाचे वडील वाहनचालक आहेत. पण त्याने २५ किलो गहू व पेनचा एक बॉक्स मदत म्हणून दिला. पैशाने श्रीमंत असण्याची गरज नाही, मनाची श्रीमंती मोठी असते याचे हे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयातील शिक्षकांनीही यात १३० किलो धान्याची भर टाकून एक आदर्श निर्माण केला.मुख्याध्यापक मनीष अग्रवाल, गिरीश दशरथ, शहा, जोशी व इतर सर्व शिक्षकांनी या उपक्रमास सहकार्य केले. आतापर्यंत एकूण धान्य १८२० किलो, वह्या १८९५ , पेन २२९३, साबन १६५ नग, खोबरेल तेल - ५ लिटर, मुलींसाठी हार १३५, टिकली पाकीट- १२० , डोक्याला लावयाचे बो ३०० नग, पेन्सिल - १ बॉक्स आणि २१, २० खोडरबर संकलित झाले आहे. तसेच दानकुंवर हिंदी महाविद्यालयात मूठभर धान्य...एक वही...एक पेन या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला. गहू, तांदूळ,ज्वारी १६५ किलो व साखर १ किलो अशी सर्व मिळून १६६ किलो धान्य १९२ वही व १८५ पेन, ६ पेन्सिल, ५ खोडरबर, ४ स्केल, ४ शार्पनर १ रंगपेटी, १ पाऊच अशी मदत केली. येथील मुली खूप गरीब घरातील आहेत. तरीही दातृत्व वृत्ती असलेल्या मुली मदत करतील, असे शिक्षक मैत्र मांदियाळी संस्थेस कळविले. पण मदतीपेक्षा संदेश पोहोचणे आवश्यक आहे. पण तेथील मुलींनी हे दाखवून दिले की मदत करण्यासाठी गरीब वा श्रीमंत असण्यापेक्षा मदतीची भावना असणे आवश्यक आहे. ज्याला संवेदनशील मन आहे तो आपल्याकडील काही तरी दुसऱ्याला देण्याचा निश्चित विचार करतो हेच या मुलींनी दाखवून दिले.मुख्याध्यापिका शर्मा व शुक्ला , राजेश देशपांडे, संचेती , जोशी व इतर सर्व शिक्षकांनी या उपक्रमास उत्तम सहकार्य केले. मैत्र मांदियाळी या संस्थेने जिल्ह्यासह मराठवाड्यात सुरु केलेल्या मूठभर धान्य...एक वही...एक पेन या उपक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात हा उपक्रम सर्वस्तरावर राबविला जाणार आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांनी केले आहे.
मूठभर धान्य...एक वही...एक पेनला प्रतिसाद
By admin | Published: February 21, 2017 11:58 PM