लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात अपंगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या दिव्यांगांचे मंगळवारी (दि. २६) प्रचंड हाल झाले. सकाळी एकीकडे तीन तास सर्व्हर ठप्प होते. तर दुसरीकडे बाह्यरुग्ण विभागात गर्दी टाळण्यासाठी भर उन्हात रांगेत उभे राहण्याची वेळ दिव्यांगांवर घाटी प्रशासनाने आणली. याविषयी दिव्यांगांनी तीव्र संताप व्यक्त केला.विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या दिव्यांगांची घाटीत मोठी गर्दी होती. नियोजित दिवशी सकाळी ९ वाजेपासून दिव्यांगांना अपंग प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू होते. मंगळवारी सकाळीच आॅनलाइन प्रणालीचे सर्व्हर बंद पडले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच ठप्प पडली. यंत्रणा सुरळीत होण्यासाठी थेट बंगळुरु आणि मुंबई येथील अधिकाºयांशी संपर्क साधण्याची वेळ आली. या सगळ्यात तीन तास उलटून गेले.दुसरीकडे बाह्यरुग्ण विभागात गर्दी टाळण्यासाठी ११६, ११७ वॉर्डांच्या पाठीमागील भागातून दिव्यांगांची रांग लावण्यात आली. सकाळी ११ वाजता सर्व्हर सुरूझाले; परंतु सकाळी ८ वाजेपासून दुपारी २ पर्यंत उन्हात रांगेत उभे राहण्याची वेळ दिव्यांगांवर आली. दुपारी एक वाजेपर्यंत अवघे ४५ प्रमाणपत्र देण्यात होते. त्यानंतर सायंकाळपर्यंत ११७ प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेडअभावी दिव्यांगांचे हाल झाले.बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नव्हती. घाटी प्रशासनाने कोणतीही सुविधा केली नसल्याची खंत अपंग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही प्रमाणपत्र वितरणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे,असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.
घाटीत दिव्यांगांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:01 AM