निलंगा : शहरातील एका सराफा दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. निलंग्यातील रामजानकी ज्वेलर्स या दुकानात अंगठी खरेदी करण्याच्या निमित्ताने एक अज्ञात व्यक्ती गेली होती. अर्ध्या ग्रॅमच्या अंगठीबाबत या चोरट्याने विचारणा केली. त्यानुसार सराफाने अंगठी दाखविली. ती ठेवून घेत चोरट्याने १ हजार ४०० रुपये रोख दुकानदारास दिले. या रकमेची पावती बनवीत असताना दुकान मालकाची नजर चुकवून या चोरट्याने काऊंटरवरील ट्रेमधून सोन्याच्या अंगठ्या ठेवलेली डबी व दागिन्यांचे पाकीट खिशात घातले. पावती थोड्या वेळाने नेतो असे सांगून हा चोरटा तातडीने दुकानाबाहेर पडला. काही वेळाने दुकान मालकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यात तपासणी केली. त्यातून अर्धा ग्रॅम अंगठी खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीनेच दागिने चोरल्याचे समोर आले. या घटनेत अंगठी, नाल, मणीगोळी, मंगळसूत्र, झुमके, गंठण, नेकलेस, मोड असा जवळपास ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी दुकान मालक रामचंद्र गुंडेराव नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलंगा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)
निलंग्यात ५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ
By admin | Published: May 20, 2014 12:23 AM