चितेगाव : औरंगाबाद तालुक्यातील गेवराई ग्रामपंचायतीने गावातील दिव्यांगांना ग्रामपंचायत स्तरावरील निधीतून ३ टक्के रक्कम वाटप न केल्याने दिव्यांग बांधवांनी शुक्रवारपासून ग्रामपंचायती समोर उपोषण सुरू केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंग व्यक्तीच्या कल्याण व पुनर्वसनकरीता राखून ठेवून खर्च करावा, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. गेवराई ग्रामपंचायतीने गावातील दिव्यांगांना अद्यापही ३ टक्के निधीचे वाटप न केल्याने दिव्यांग अरूण सुखदेव चव्हाण, विष्णू उत्तम मुळे, मयुर दिलीप जाधव, अनिल प्रल्हाद साठे, आजिनाथ भीमराव गवारे, प्रतिभा रंगनाथ धुमाळ, शिला तात्याराव जाधव यांनी गेवराई ग्रामपंचायत समोर शुक्रवारपासून उपोषणास सुरुवात केली आहे.
गावातील अपंग व्यक्ती अरूण सुखदेव चव्हाण यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरूपात अर्ज व तक्रार केली. याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला.
गेवराई ग्रामपंचायतीमध्ये वीस दिवसांपासून ग्रामसेवक नसल्यामुळे काम बंद पडले आहे. या विषयी मी गट विकास अधिकारी यांना कळविल्याचे सरपंच बंडू राठोड यांनी सांगितले.
अनेक दिवसांपासून गावातील दिव्यांग ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांंकडे आमच्या हक्कच्या तीन टक्के निधीची मागणी करत असून, याकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप अरूण चव्हाण यांनी केला आहे.