औरंगाबाद : ‘जय भद्रा’ असा जयघोष करीत हजारो हनुमानभक्त रात्री खुलताबादच्या दिशेने पायी रवाना झाले. यात युवा भाविकांचा सहभाग मोठा होता. तसेच युवती व महिलाही मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. खुलताबाद येथील भद्रा मारुती महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनले आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या सायंकाळी औरंगाबादेतून हजारो भक्त भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी पायी निघत असतात. मागील तीन दशकांची परंपरा कायम ठेवत आज सायंकाळी हजारो भाविक खुलताबादच्या दिशेने पायी निघाले होते. कोणी महावीर चौकापासून गटागटाने पायी जाताना दिसले तर अनेक जण छावणीमार्गे दौलताबाद रोडवर जात होते. पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये तरुणांचा समावेश अधिक होता. ‘जय भद्रा’ असा जयघोष करीत युवक पायी जात होते. काही भजनी मंडळेही या पदयात्रेत सहभागी झाली होती. टाळ- मृदंगाच्या तालावर भजन म्हणत ही मंडळी पुढे जात होती. तरुणी व महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. २० वर्षांपूर्वी पायी जाणाऱ्यांमध्ये तरुणी व महिलांची संख्या नगण्य होती. मात्र, यंदा ३०० पेक्षा अधिक युवती, महिला पायी भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेल्या. दौलताबाद मार्गावर ठिकठिकाणी विविध मित्रमंडळे, सामाजिक मंडळांच्या वतीने भाविकांसाठी फराळ, फळ, चहा, दुधाची व्यवस्था करण्यात आली होती.
खुलताबाद रोडवर हनुमानभक्तांचा महापूर
By admin | Published: April 22, 2016 12:46 AM