औरंगाबाद : हनुमानवाडी (ता. खुलताबाद)ची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन बोलकी केली. आकर्षक रंगरंगोटी, सजावट, परिसर स्वच्छता, वर्गखोल्यांच्या भिंती बोलक्या करून शाळेचा चेहरामोहरा बदलला. सुंदर माझे कार्यालय उपक्रमात सहभागी होऊन शिक्षक, शालेय समिती व गावकऱ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग व वरिष्ठांच्या मदतीमुळे हे शक्य झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शशी सोमवंशी यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सुंदर माझे कार्यालय उपक्रमातील शाळाभेटीच्या उपक्रमाची सुरुवात हनुमानवाडी येथून केली. ते म्हणाले, इंड्युरंस कंपनीने शाळेचे नूतनीकरण करून दिले, तर येथील दोन शिक्षकांनी कलात्मकतेने शाळेला बोलके केले. शिक्षकांनी पदरमोड करून २० हजार रुपये यासाठी खर्च केले तर शाळा समिती व गावकऱ्यांनी उर्वरित मदत केली. त्यात शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी ५ तर गटशिक्षणाधिकारी यांनी साडेतीन हजारांची मदत करून हातभार लावला. शिक्षकांच्या कामाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी कौतुक करत इथेच थांबू नका, यासाठी प्रेरणाही दिली. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष दत्तू गायकवाड, सहशिक्षिका श्रीमती साबळे, रेणुका गायकवाड, सरपंच जयश्री बोर्डे, गणेश बोर्डे, दासू गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, कुसुम जंगले, सुनीता गायकवाड यांच्यासह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.